नागपूर : आगामी दिवाळी सणानिमित्त फटाक्यांच्या विक्रीसाठी इच्छुक विक्रेत्यांना नागपूर शहर पोलिसांनी महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षी (२०२५) फटाका विक्रीसाठी तात्पुरत्या परवान्यासाठी अर्ज प्रक्रिया २६ ऑगस्टपासून सुरू होत असून १० सप्टेंबरपर्यंत संबंधित पोलीस परिमंडळ कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
परवाना अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे-
विक्रेत्यांना विहित नमुन्यातील अर्जासोबत जागेचे व रहिवाश्यांचे ना हरकत प्रमाणपत्र, जागेची मालकी हक्काची कागदपत्रे, स्थळदर्शक नकाशा, अग्निशमनाची हमीपत्रिका तसेच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अनिवार्यपणे जोडावे लागणार आहे. अंतिम मुदत (१० सप्टेंबर) नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
फक्त ‘ग्रीन क्रॅकर्स’लाच परवानगी-
मा. हरित लवाद (NCLT) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार, नागपूर शहर मध्यम प्रदूषण श्रेणीतील शहर म्हणून वर्गीकृत असल्याने फक्त ग्रीन क्रॅकर्स (पर्यावरणपूरक फटाके) विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी असेल. पारंपरिक, प्रदूषणकारी फटाक्यांची विक्री संपूर्णपणे बंदीस्त आहे.
‘या’ भागात परवाना मिळणार नाही-
शहरातील काही प्रमुख गर्दीच्या रस्त्यांवर व बाजारपेठेत फटाके विक्रीस परवानगी मिळणार नाही. यामध्ये सिताबर्डी मेनरोड, महाल चौक परिसर, बडकस चौक, गोळीबार चौक, टिमकी ते शहीद चौक, हंसापुरी, मारवाडी चौक, मेयो व डागा रुग्णालय परिसर, मेडिकल कॉलेज परिसर, इंदोरा चौक, गोकुळपेठ मार्केट, सदर रेसिडेन्सी रोड यांचा समावेश आहे. या ठिकाणी कोणताही अर्ज करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सुरक्षेसाठी बंधनकारक अटी-
फटाका विक्रेत्यांनी काटेकोरपणे पाळायच्या सुरक्षेच्या अटी पुढीलप्रमाणे –
फटाके सुरक्षित व अज्वलनशील साहित्यापासून बनविलेल्या शेडमध्येच ठेवावेत.
दुकानांमध्ये किमान ३ मीटर अंतर ठेवावे व सुरक्षित स्थळापासून ५० मीटर दूर असावे.
तेल/गॅस दिवे, मेणबत्त्या, उघडे विद्युत दिवे यांचा वापर बंदीस्त असेल.
एका क्लस्टरमध्ये जास्तीत जास्त ५० दुकानेच परवानगीस पात्र असतील.
लाकडी रॅक व कापडी शामियाना वापरण्यास सक्त मनाई.
क्लोरेटयुक्त व बंदी घातलेले फटाके दुकानात ठेवू नयेत.
१८ वर्षाखालील व्यक्तींना फटाके विक्री होऊ नये.
अग्निशामक यंत्रे व बादल्या आवश्यक संख्येने ठेवणे अनिवार्य.
गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी.
आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा ठेवावा.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-
सर्वोच्च न्यायालयात दाखल रिट पिटीशन क्रमांक ७२८/२०१५ नुसार सिरीज क्रॅकर्स व लॅरीजच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच ई-कॉमर्स संकेतस्थळांद्वारे (अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आदी) फटाके विक्री करण्यास बंदी आहे.
पोलिस आयुक्तांचा इशारा-
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी स्पष्ट केले की, “विना परवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. विक्रेत्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊनच फटाका विक्री होईल.”
नागपूरकरांसाठी या सूचना दिवाळीत सुरक्षितता व प्रदूषण नियंत्रण यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.