मुंबई: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रंगत आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी वेगाने सुरू आहे. एनडीएचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना विजयी करण्यासाठी खासदारांचा पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या अनुषंगाने फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांशी थेट संवाद सुरू केला असून, त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोन केल्याचे समोर आले आहे.
या फोन कॉलची पुष्टी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली. ते म्हणाले, “केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. मतदानासाठी विनंती करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे.” त्यामुळे या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. राजकीय मतभेद असले तरी महत्त्वाच्या निवडणुकीत संवादाचे पूल बांधण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
फडणवीसांचे आवाहन-
फडणवीस यांनी स्वतः याबाबत भाष्य करताना सांगितले, “महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकजुटीने आपल्या राज्यातील उमेदवाराला साथ द्यावी. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनीही राधाकृष्णन यांना समर्थन करावे. महाराष्ट्रातून उपराष्ट्रपती होतोय, हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
निवडणुकीतील संख्याबळ-
या निवडणुकीत एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन उमेदवार आहेत, तर इंडिया आघाडीने माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरवले आहे. महाराष्ट्रातून एकूण ६८ खासदार मतदान करणार असून, त्यापैकी महाविकास आघाडीकडे ३८ तर महायुतीकडे ३० खासदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे थोडे जड मानले जात असले तरी भाजपकडून संपर्क मोहिमेला विशेष गती देण्यात आली आहे.