नागपूर :शहरातील वाहतूक कोंडी व नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन नागपूर ट्रॅफिक पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्स बसांवर मोठी मोहीम राबवली. आज (20 ऑगस्ट) सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईचा परिणाम संध्याकाळपर्यंत स्पष्ट दिसून आला.
गणेशपेठ बस स्टँड चौक, राजाराम देवी चौक तसेच डालडा कंपनी परिसर हे खासगी ट्रॅव्हल्स बसांचे मुख्य ठिकाण मानले जात होते. नेहमीप्रमाणे रस्त्यावर बस थांबवून प्रवाशांची चढ-उताराची प्रक्रिया सुरू राहत असे. मात्र, आज सकाळपासून सुरू झालेल्या पोलिसांच्या कडक कारवाईमुळे या ठिकाणी एकाही खाजगी बस चालकने उभे राहण्याचे धाडस केले नाही.
वाहतूक पोलिसांच्या तपासणीनंतर दुपारपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण परिसर रिकामा दिसून आला. स्थानिक नागरिकांनीही यामुळे झालेल्या वाहतूक सुरळीतपणाचा अनुभव घेतला.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई सतत सुरू राहणार असून, नियम मोडणाऱ्या ट्रॅव्हल्सवर गुन्हे दाखल करण्याची तयारी आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालक आणि मालकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळा निर्माण करणाऱ्या खासगी बसांविरोधातील पोलिसांची ही मोहीम पुढील काही दिवसांत आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.