नागपूर : शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली करणारा आणि जीव धोक्यात घालणारा प्रकार उघडकीस आला आहे. काही युवक फॉर्च्युनर कारवर धोकादायक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी तत्काळ लक्ष घालून कारवाई सुरू केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की टोयोटा फॉर्च्युनर ही आलिशान कार वेगाने धावत आहे आणि तिच्या छतावर एक युवक बसलेला आहे. हा प्रकार केवळ स्टंट करणाऱ्याच्या जीवाला नव्हे, तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण करणारा आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
प्राथमिक चौकशीत हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी सिव्हिल लाईन परिसरातील सेमिनरी हिल भागात चित्रीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ट्रॅफिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे गाडी तसेच संबंधित आरोपींचा शोध सुरू केला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.