नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट सिटीने शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहराच्या अत्यंत गजबजलेल्या इतवारी बाजार परिसरात स्मार्ट सिटीद्वारे ‘मल्टीलेव्हल’ रोबोटिक मेकॅनिकल पार्किंग सुरू करण्यात आले आहे. या अत्याधुनिक पार्किंगमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात या मल्टीलेव्हल रोबोटिक मेकॅनिकल पार्किंग सुरू करण्यात आले आहे. या रोबोटिक पार्किंगमध्ये २५ चारचाकी आणि १५० दुचाकी वाहने सुरक्षितपणे उभी करता येतील. या सुविधेत वाहनचालकांना आपले वाहन फक्त तळमजल्यावर पार्क करायचे आहे. त्यानंतर, रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रणाली आपोआप वाहन सुरक्षित स्लॉटमध्ये पार्क करेल. यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार असून, पार्किंगची प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि सोपी होणार आहे.
याठिकाणी पार्किंग शुल्क सामान्य नागरिकांना परवडेल अशा प्रकारे निश्चित करण्यात आले आहे. तसेच नियमित ये-जा करणाऱ्यांसाठी मासिक पासची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय वाहनचालकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालय आणि कॅफेटेरियाची सोयही येथे करण्यात आली आहे. अशी माहिती स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक(मोबिलिटी) श्री. राजेश दुफारे यांनी दिली.
विशेष म्हणजे, नागपूर स्मार्ट सिटीने दुचाकी वाहनांसाठी महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक मेकॅनिकल पार्किंग विकसित केले आहे. हे अभिनव तंत्रज्ञान भारतातील इतर शहरांसाठीही एक आदर्श ठरू शकते. या नाविन्यपूर्ण सुविधेमुळे इतवारीसारख्या व्यस्त बाजारपेठेत वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, वेळेची बचत होईल आणि शहरातील एकूणच शहरी वाहतुकीचा अनुभव सुधारेल अशी अपेक्षा आहे.