नागपूर :गणेशोत्सव आणि नवरात्रीसारख्या उत्सवांमध्ये डीजे आणि अश्लील गाण्यांचा वाढता वापर पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. डीजे संस्कृतीमुळे सणांचे पावित्र्य हरवत असून तरुण पिढीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. आपल्या उत्सवांमध्ये भजन, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाच स्थान मिळाले पाहिजे,असे ते म्हणाले.
गडकरींच्या या भूमिकेला नागपूरचे युवा नेते व भाजप प्रवक्ते सागर पांडे यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या विषयावर ‘नागपूर टुडे’शी संवाद साधत पांडे यांनी भाष्य केले. गणेशोत्सव हा फक्त उत्सव नाही, तर तो भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. डीजेमुळे वातावरण गोंगाटी होते आणि भक्ती हरवते. त्यामुळे आम्ही गणेश मंडळांना भजन स्पर्धा, ढोल-ताशांचे कार्यक्रम आणि भक्तिगीतांचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत,असे ते म्हणाले.
गडकरींनी जाहीर केले की ‘खासदार सांस्कृतिक उत्सवा’ अंतर्गत यंदा नागपूरमधील 300 हून अधिक गणेश मंडळांमध्ये भजन, नाट्यप्रयोग, भक्तिगीते आणि संस्कृती अधोरेखित करणारे उपक्रम आयोजित केले जातील. “या कार्यक्रमांचा खर्च आयोजक मंडळांना करावा लागणार नाही. आम्ही तो उचलणार आहोत. हे उपक्रम लोकांना मनोरंजनासोबत चांगले संस्कारही देतील,” असे गडकरींनी स्पष्ट केले.
त्यांनी संत तुकडोजी महाराज, संत कबीर यांच्या भजनांचा दाखला देत, “सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी संगीत, नाटक आणि भक्तिगीते आवश्यक आहेत. डीजेच्या गोंगाटाऐवजी भक्तीमय वातावरण सणाला खरी ओळख देईल,” असे सांगितले.
तरुणाई डीजेकडे आकर्षित होते, हे मान्य करत पांडे पुढे म्हणाले, आजची पिढी सोशल मीडियावर जास्त वेळ घालवते. म्हणून आम्ही भक्तिगीते आणि आरत्या आधुनिक सादरीकरणातून लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे युवकही स्वखुशीने या संस्कृतीकडे वळतील.
सांस्कृतिक उपक्रमांचा विस्तार-
गडकरींनी सांगितले की 4 हजारांहून अधिक भजन मंडळांना तबला व हार्मोनियम देण्यात आले आहेत. तसेच RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त 28 सप्टेंबर रोजी सुरेश भट सभागृहात सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात 25 विशेष गीते प्रकाशित होणार आहेत. या गीतांतून शिस्त, राष्ट्रीय अभिमान आणि रस्ते सुरक्षा यांचा संदेश दिला जाणार आहे. गणेशोत्सवाचा खरा आनंद डीजेच्या गोंगाटात नाही, तर भजन, आरत्या आणि संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमांत आहे. त्यामुळे सर्व गणेशभक्तांनी भक्तीमय वातावरणात बाप्पाचे स्वागत करावे.