नागपूर : राज्यभरात चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा सूत्रधार निलेश वाघमारे चार महिन्यांच्या फरारीनंतर अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मालिका वेगाने सुरू झाली आहे. रविवारी पोलिसांनी आणखी दोन कनिष्ठ लिपिकांना ताब्यात घेतले आहे.
नागपूर जिल्ह्यातील दोन शाळांमध्ये कार्यरत असलेले मंगेश केशव निनावे आणि मनीषकुमार केशव निनावे अशी या आरोपींची नावे आहेत. फर्जी शालार्थ आयडीच्या आधारे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तरीदेखील ते नियमितपणे वेतन घेत राहिले आणि शासनाला तब्बल ४१ लाख ४९ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
या प्रकरणात आतापर्यंत तीन विभागीय उपशिक्षण संचालक, तीन शिक्षणाधिकारी, चार लिपिक, दोन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, तीन सहाय्यक शिक्षक आणि एक वेतन अधीक्षक अशा एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे.