नागपूर – सरकारी कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेने मोठे यश मिळवले आहे. या मोहिमेत राज्यातील 12,500 कार्यालयांनी सहभाग घेतला होता. या यशस्वी मोहिमेत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) च्या नागपूर परिमंडल कार्यालयाने विभागस्तरीय कार्यालयांच्या गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, नागपूर प्रादेशिक संचालक कार्यालयालाही या मोहिमेत तृतीय क्रमांक मिळाला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित एका विशेष कार्यक्रमात, महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरिक्त आयुक्त माधवी चवरे खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील,महानगए पालीका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपुर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नेत्रदीपक यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि संचालक मंडळाने प्रादेशिक संचालक परेश भागवत आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या कामगिरीचे श्रेय सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना असल्याचे सांगत, परेश भागवत आणि दिलीप दोडके यांनी सर्वांचे आभार मानले.