नागपूर : नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक व प्रशासन यांच्यातील वाद चिघळला आहे. पगाराची मागणी केल्यानंतर प्राध्यापक डॉ. प्रफुल वाडीचार यांना पदमुक्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयातील प्राध्यापकांना पगाराचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. ६७ प्राध्यापकांचे मानधन रखडलेले असल्याची माहिती असून, या पार्श्वभूमीवर डॉ. वाडीचार यांनी प्राचार्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यानंतर त्यांचे आधार आधारित हजेरी आयडी बंद करण्यात आले, महाविद्यालयात प्रवेश रोखण्यात आला आणि सेवेतून मुक्त करण्याची कारवाई झाली, असा त्यांचा आरोप आहे.
डॉ. वाडीचार यांनी सांगितले की, “मी नियमित व प्रामाणिकपणे काम करणारा कर्मचारी असूनसुद्धा केवळ पगाराची हक्काची मागणी केल्यामुळे मला लक्ष्य केले गेले. प्राचार्यांनी जबरदस्तीने राजीनामा द्यावा असा दबाव टाकला. हा मानसिक छळ असून, यापूर्वीही डिसेंबरमध्ये असाच प्रकार माझ्याबाबत घडला होता.
प्राचार्य काळे यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, प्राचार्य वाय. डी. काळे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, “महाविद्यालयाला काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेण्याच्या आदेशामुळे पगार उशिरा होत आहेत. वाडीचार यांना आम्ही अनेकदा समजावले; मात्र त्यांनी वारंवार माझा अपमान केला. त्यांच्या राजीनाम्याला मी मान्यता दिली असून उर्वरित पगार त्यांच्या खात्यात जमा केला आहे. इतर ६७ प्राध्यापकांचे पगार असून झाले नाही. सरकारकडे दीड कोटींची स्कॉलरशिप थकबाकी म्हणून आहे. ती मिळाली की आम्ही इतके प्राध्यापकांचे पगार करू अशी माहिती काळे यांनी ‘नागपूर टुडे’शी बोलताना दिली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा खाजगी वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगार आणि सेवा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.