नागपूर :वर्षअखेरीस होणाऱ्या महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकासकामांचा वेग वाढवला आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपंचायतींसाठी तब्बल ५० कोटी रुपये मंजूर करून सरकारने विकास निधीचे वाटप सुरू केले आहे.
राज्यभरातील नगरपंचायतींसाठी बुधवारी ५०० कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर करण्यात आला. यात नागपूर आणि चंद्रपूर या विदर्भातील दोन जिल्ह्यांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी, महादुला, पिंपळा आणि बहादुरा नगरपंचायतींसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या सर्व नगरपंचायती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात येतात.
तर, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर आणि पोंभूर्णा नगरपंचायतींसाठीही १० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. या दोन्ही नगरपंचायती माजी वित्तमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात असून, निधी समान प्रमाणात वितरित केला जाणार आहे.
याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड आणि देऊळगाव नगरपंचायतींसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.