मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी मांस विक्री व कत्तलखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आता तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्यदिन साजरा करताना जर सरकार नागरिकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने घालते, तर तो खरा स्वातंत्र्यदिन कसा? कोणाला काय खायचं हे सरकार किंवा महापालिकांनी ठरवू नये.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कल्याण-डोंबिवलीतल्या मनसैनिकांना मी मांस विक्री सुरू ठेवायला सांगितलं आहे.
ठाकरे यांचा सवाल होता की, जर स्वातंत्र्यदिनीच बंदी आणायची असेल तर ही दुहेरी भूमिका कशाला? “स्वातंत्र्याचा अर्थच जर लोकांच्या निवडीवर बंदी आणणे असेल, तर अशा बंदीला आपण विरोध करणारच,असे ते म्हणाले.
दरम्यान, या बंदीला विरोध करत डोंबिवलीतील खाटीक समाजाने आंदोलन केले असून, बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. मात्र, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय नवा नसून पूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत.या पार्श्वभूमीवर मांस विक्री बंदीचा मुद्दा केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय रंगही घेत आहे.