मुंबई : मातोश्री येथे आज झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात विदर्भ आणि मुंबईतील भाजप तसेच काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करताच सत्ताधाऱ्यांवर रोखठोक हल्ला चढवला.
मतांची चोरी उघडकीस-
उद्धव ठाकरे म्हणाले, “देशभर आणि महाराष्ट्रात उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे. शासन यंत्रणा पूर्णपणे बेबंदशाहीच्या मार्गाने चालत आहे. भ्रष्टाचार्यांवर कारवाई होत नाही आणि त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. काल दिल्लीतील घटनेत 300 खासदारांना अटक झाली. मतांची चोरी करून सत्तेत बसलेले आता जनतेसमोर उघडे पडत आहेत. लोकांच्या डोळ्यावरची पट्टी निघत असून, या सत्तेचे दिवस संपत आले आहेत.”
शेतकरी आंदोलनावरून सरकारला धारेवर-
शेतकरी आंदोलनाची आठवण करून ठाकरे म्हणाले, “दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा मार्ग अडवण्यासाठी रस्त्यांवर खिळे पसरवले, मोठमोठी बॅरिकेट्स लावली. आज निवडून आलेल्या खासदारांना संसदेत प्रश्न विचारण्यापासून रोखले जाते. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे दिले तरी कारवाई होत नाही. हे सरकार खोट्या गोष्टी सांगून सत्तेत आले आहे.”
नवे कार्यकर्ते, नवी उर्मी-
शिवसेनेत दाखल झालेल्या नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्तेच्या हव्यासापायी काही जण भाजपकडे गेले, मात्र आता तेच निराश झाले आहेत. भाजपची सत्ता ढासळण्याच्या उंबरठ्यावर आहे. आपण सर्वांनी जनतेच्या हक्कासाठी एकजूट होऊन लढा उभारायचा आहे.