बंगळुरु : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. बंगळुरूमधील फ्रीडम पार्क येथे पार पडलेल्या ‘मतदान हक्क रॅली’मध्ये बोलताना त्यांनी मतांची चोरी, निवडणूक यंत्रणेतील अनियमितता आणि संविधानाच्या रक्षणाची गरज या मुद्द्यांवर केंद्र सरकारवर आणि निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले की, भारताचे संविधान सर्व नागरिकांना मताचा हक्क देतं. पण आज देशात मतांचा अपहार सुरू असून, निवडणूक प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत. महादेवपुरा मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख मते फसवणुकीने टाकली गेली आहेत.” त्यांनी सांगितले की या मतांची चोरी वेगवेगळ्या पद्धतीने झाली. काही मतदारांनी अनेक ठिकाणी मतदान केलं, काही मतदारांची पत्ते अस्तित्वातच नव्हते, तर काही घरांमध्ये एकाच पत्त्यावर ४०-४० मतदार नोंदवले गेले.
“गेल्या निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आमच्यावर नाही, तर संविधानावरही आघात केला. देशातील लोकशाही संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
“शपथपत्र का हवं? मी संसदेत शपथ घेतली आहे”
राहुल गांधी यांनी आयोगावर रोष व्यक्त करत म्हटलं की, निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो आहे. मी संसदेत, संविधानावर हात ठेवून आधीच शपथ घेतली आहे. लोक जेव्हा आयोगाच्या डेटाबाबत प्रश्न विचारू लागले, तेव्हा त्यांनी राजस्थान आणि बिहारमध्ये आपली वेबसाइटच बंद केली. लोकांनी प्रश्न विचारले तर त्यांची फसवणूक उघड होईल, याची त्यांना भीती आहे.
आमची मागणी आहे की, आयोगाने आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी द्यावी. काल मी हे दाखवून दिलं की मतांची चोरी झाली आहे. जर ई-वोटर यादी दिली गेली, तर आम्ही सिद्ध करू शकतो की देशाचे पंतप्रधान मतदान चोरून सत्तेवर आले आहेत,असा थेट आरोप राहुल गांधींनी केला.
ते पुढे म्हणाले, “जर आयोग डेटा देणार नसेल, तरी आम्ही हे काम एकाच जागेवर नाही, तर १०, २० किंवा २५ जागांवर करू शकतो. आमच्याकडे कागदी पुरावे आहेत. एकच मतदार अनेकवेळा मतदान करत असल्याचे आम्ही दाखवून देऊ. तुमच्या चुकीचे सत्य एक ना एक दिवस उघड होणारच आहे.”
मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आग्रह-
राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आगामी काळात काँग्रेस या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.