नवी दिल्ली : हुमा कुरेशी या बॉलिवूड अभिनेत्रीच्या कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी रात्री राजधानी दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तिच्या चुलत भावाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. केवळ पार्किंगच्या वादातून घडलेली ही हिंसक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे.
मृतक आसिफ कुरेशी (वय ४०) यांच्यावर दोन तरुणांनी रागाच्या भरात धारदार शस्त्राने वार केले. हा हल्ला इतका गंभीर होता की, छातीत खोल जखमा झाल्यामुळे आसिफ जागीच कोसळले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना पार्किंगच्या किरकोळ वादातून उफाळून आली. रात्रीच्या सुमारास शेजाऱ्याच्या मुलाने घराच्या गेटसमोर स्कूटर उभी केली होती. त्यामुळे आसिफ यांनी त्याला गाडी थोडी बाजूला घालण्यास सांगितले. पण त्या मुलाने त्यांच्याशी उर्मट वागणूक दिली, शिवीगाळ केली आणि “खाली येतोच सांगायला” असे म्हणत आपला भाऊ घेऊन खाली उतरला.
त्यानंतर दोघांनी मिळून आसिफ यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
या घटनेमुळे कुरेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतकाच्या पत्नीने सांगितले की, वादाच्या पार्श्वभूमीवर याआधीही त्या दोघांशी पार्किंगसंबंधी वाद झाले होते. मात्र यावेळी गोष्ट थेट जीवघेणी ठरली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र पोलिसांच्या ताब्यात असून, सध्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून, या फुटेजच्या आधारे तपास अधिक खोलात नेला जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येचं मूळ कारण तात्पुरतं किरकोळ वाटत असलं, तरी यामागे काही अधिक खोल वाद होते का, याचाही शोध घेतला जात आहे.
शहरामध्ये वाढणाऱ्या असहिष्णुतेचा आणि थोडक्याच कारणावरून हातात शस्त्र उचलण्याच्या प्रवृत्तीचा हा प्रकार चिंताजनक असून, समाजाला हादरवणारा आहे.