नागपूर : आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदाराविरोधात लाच मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर पथकाने गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कर्तव्यातील भ्रष्टाचाराच्या या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला पुन्हा एकदा काळिमा फासला आहे.
तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे हजेरी लावून तक्रार नोंदवली होती. त्यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या दोषारोपपत्रात कमकुवत मुद्दे ठेवून लाभ मिळवून देण्यासाठी पो.उ.नि. गणेश गोविंद राऊत (वय ५१) आणि पो.ह. चंद्रशेखर दामोदर घागरे (वय ५०) यांनी तब्बल २ लाख रुपये लाच मागितली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने २३ जून ते १४ जुलै २०२५ दरम्यान पडताळणी करण्यात आली. यादरम्यान, संशयितांनी पंचासमक्ष १ लाख रुपयांची मागणी करत लाच घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र सापळा कारवाईदरम्यान संशयितांना शंका आल्याने त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. त्यानंतरही लाच मागणीची पुष्टी झाल्याने त्यांच्या विरोधात सदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ४७४/२०२५, कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, अप. पोलीस अधीक्षक श्री. सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक श्री. राकेश साखरकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. सापळा अधिकारी पो.नि. मयूर चौरसिया, तसेच पोलीस निरीक्षक विवेक पडघान, महिला पोलीस कांचन गुलबासे, पो.शि. हरिष गांजरे, अमोल मेंगरे, प्रफुल बांगडे, विकेश राऊत, व चालक प्रिया नेवारे या पथकाने ही योजना यशस्वी केली.
नागपूरकर नागरिकांना आवाहन –
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणताही खाजगी एजंट शासकीय कामासाठी कायदेशीर फीव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.