नागपूर: नागपूर शहरातील लक्ष्मीनगर झोनमधील प्रताप नगर जलकुंभातून (ईएसआर) पाणीपुरवठा होत असलेल्या स्वावलंबी नगर आणि दीनदयाळ नगर येथील रहिवाशांना गेल्या दहा दिवसांपासून होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे. मनपा व ओसीडब्ल्यू च्या चमूने तक्रारीच्या दिवसापासून प्रकरण युद्धपातळीवर हाताळून समस्या सोडवण्यासाठी काम सुरू केले होते.
स्वावलंबी नगर आणि दीनदयाळ नगर येथे होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्याच्या कामादरम्यान प्रभावित क्षेत्रातील रहिवाशांना पाणी पुरवठा सुरळीत रहावा यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. परिसरात अनेक ठिकाणी सांडपाण्याची गटारे थेट पाण्याच्या वितरण वाहिनीवर किंवा अगदी जवळ बांधलेली आढळली. त्यामुळे दूषित पाण्याचा नेमका स्त्रोत शोधणे कठीण झाले होते. परिणामी परिसरातील दूषित पाण्याचा स्त्रोत शोधण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला.
या प्रक्रियेदरम्यान, पाईपलाईनचे अनेक भाग वेगळे करण्यात आले व ते स्वच्छ करण्यात आले. काही ठिकाणी तात्पुरते पर्यायी मार्ग वापरले गेले. शेवटी, पडोळे चौकापासून पहिल्या डाव्या गल्लीतील एका सांडपाण्याच्या गटाराजवळ दूषित पाण्याचा स्त्रोत असल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे ६ मीटर आणि ११ मीटर लांबीच्या पाईपलाईनच्या भागांवर परिणाम झाला होता. उपाययोजना म्हणून, १६० मिमी व्यासाच्या एकूण ४३ मीटर लांबीच्या पाईपलाईनचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे.
मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ ला संध्याकाळपासून स्वावलंबी नगर आणि दीनदयाळ नगर येथील सर्व प्रभावित घरांमध्ये स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.