नागपूर : मनपाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ चे सुधारित निकाल बुधवारी (ता.६) जाहीर करण्यात आले आहेत. स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर महानगरपालिकेला १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहर या गटात यावर्षी २२ वा क्रमांक (रँक) प्राप्त झाला आहे. यापूर्वीच्या निकालात नागपूरला २७ वे स्थान प्राप्त झाले होते. आता नव्याने जाहीर झालेल्या निकालात नागपूर महानगरपालिकेला उल्लेखनीय कामगिरी करीत मोठी झेप घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरने देशात ४० शहरांपैकी ‘२२ ए’ वा क्रमांक मिळाला आहे. तर, राज्यात ४१४ युएलबीपैकी नागपूरचा ‘२५ ए’ वा क्रमांक आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या देखरेखीत नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छता संदर्भात नागपूर शहरात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार आता जाहीर झालेल्या निकालात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध निकषांवर आधारित झालेल्या मूल्यांकनात नागपूर शहराची रँकिंग उल्लेखनीय रित्या सुधारली आहे. यापूर्वी जाहीर निकालात घराघरातून कचरा संकलनात ३० टक्के गुण प्राप्त झाले होते, त्यात आता सुधारणा झाली असून ९० टक्के गुण प्राप्त झाले आहे. याशिवाय कचरा वर्गीकरणात केवळ १ टक्के गुण देण्यात आले होते, सुधारणेनुसार आता यात ६० टक्के गुण मिळाले आहे. नागपूरला जीएफसी स्टार रेटिंग मध्ये १ स्टार प्राप्त झाले आहे. तर ओडीएफ सर्टिफिकेट मध्ये वाटर प्लस प्रमाणपत्र मिळाले आहे.
केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात नागपूर शहराची स्वच्छतेतील प्रगती आणि सहभागात्मक उपक्रमांचे कौतुक करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५च्या निकालात नागपूरला मिळालेल्या गुणांच्या बेरजेत त्रुटी आढळल्याने मनपा प्रशासनाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार गुणांची पुनर्तपासणी करण्यात आली असून, आता सुधारित निकालानुसार मनपाची रँकिंग २७ व्या स्थानावरून थेट ‘२२ ए’ वर आली आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून ‘स्वच्छता ही सेवा’, ‘बॅकलेन स्वच्छता मोहीम’, सी अँड डी वेस्ट, कॉम्प्रेस्ड बायो गॅस प्रकल्प, बायोमायनिंग प्रकल्प तसेच सार्वजनिक सहभाग वाढवणारे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. तसेच मनपाद्वारे शहरातील स्वच्छतेवर भर देण्याकरिता विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. यात एक तारीख एक तास, आर आर आर सेंटर, स्वच्छ मोहल्ला स्पर्धा, स्वच्छ बाजारपेठ, इको ब्रिक्स यासोबतच शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृती केली जात आहे. या संपूर्ण उपक्रमांना नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनपा भविष्यात अधिक प्रयत्न करून स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नागपूरचा रँक प्रथम दहा क्रमांकात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.