मुंबई:मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येत असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली ही युती आता प्रत्यक्षात उतरली असून, ती बेस्ट कामगार सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच दिसून येणार आहे.
राज ठाकरे यांच्या मनसेची कर्मचारी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेने 18 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
राजकीय समीकरणांना नवा वळण-
ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट केवळ बेस्ट पुरती मर्यादित राहणार नाही, तर ती मुंबई महापालिका निवडणुकीचीही नांदी ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी अस्मिता आणि स्थानिक रोजगाराचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणत या दोन्ही पक्षांनी मराठी मतदारांमध्ये नव्या आशा निर्माण केल्या आहेत. अनेक कर्मचारी दोन्ही संघटनांशी निगडित असल्यामुळे ही युती अधिक प्रभावी ठरणार, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
खासगीकरणाविरोधात आक्रमक भूमिका
सध्या सत्तेवर असलेल्या महायुती सरकारवर बेस्टमधील नोकर्या खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा कट आखत असल्याचा आरोप ठाकरे-मनसे युतीने केला आहे.
त्यामुळे बेस्टमधील मराठी कामगारांमध्ये असंतोषाचं वातावरण तयार झालं असून, ही नवी युती त्यांच्यासाठी आधारवड ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ग्रॅज्युएटी थकली, भरती थांबली – कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बेस्ट कर्मचाऱ्यांना नियमित ग्रॅज्युएटी मिळत होती. मात्र सध्याच्या सरकारच्या काळात ती प्रक्रिया ठप्प झाली आहे. तसेच नवीन भरतीही बंद असून, निवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसेही थकले आहेत.
हे सगळं लक्षात घेता, कामगारांच्या हितासाठी ठाकरे आणि मनसे युती प्रभावी ठरणार, असं मत संघटनेतून व्यक्त केलं जात आहे.
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र – मराठी राजकारणात नवचैतन्य?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे मराठी राजकारणात एक नवा टप्पा मानला जात आहे. विशेषतः कामगार संघटनांच्या क्षेत्रात ही युती मोठा प्रभाव पाडणार असून, त्याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.