नागपूर : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, ३१ वर्षीय तरुणाने सदर – मानकापूर उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यशवंत रमेश साहू (वय ३१, रा. कुक्रेजा नगर, जरीपटका) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सुरक्षा रक्षक होता मृत व्यक्ती-
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत साहू हे MESKO कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी दुपारी त्यांनी आपल्या दुचाकीने सदर उड्डाणपुलावर येत ती रस्त्याच्या कडेला लावली आणि अचानक पुलावरून खाली उडी घेतली.
घटनेस्थळीच मृत्यू-
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, यशवंत यांनी गंभीर जखमांमुळे घटनास्थळीच प्राण सोडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट-
यशवंत यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.