मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार उघड झाल्यानंतर राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. निवृत्त शासकीय महिला कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, अशा अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकरणावर चर्चा झाली. यामध्ये पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करून जर त्यांनी अपात्रतेच्या आधारावर पैसे घेतले असतील, तर त्यांच्या विरोधात कारवाई करून संबंधित रक्कम वसूल केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरू असलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असूनही योजनेंतर्गत लाभ घेत होते. या प्रकरणात अनेक पुरुषांचेही समावेश असल्याची माहिती आहे. त्यांच्या घरी पात्र महिला नसताना त्यांच्याच खात्यात पैसे जमा झाल्याचे प्रकार आढळले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेत सुमारे ४८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी “घोटाळा कुणी केला?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही कारवाईचा इशारा दिला आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि शासन दिशाभूल करणाऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.सरकारने आता अपात्र लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले असून, या योजनेच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू आहे.