सावनेर: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे बुधवार, 30 जुलै 2025 रोजी कृषी आयुक्त श्री. सुरज मांढरे यांनी विंचूर (ता. सावनेर) येथे भेट देत श्री. इकबाल गफार बराडे (रा. वेलतूर) यांच्या गुलाब फुलशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (MGNREGS) सन 2022-23 अंतर्गत करण्यात आलेल्या गुलाब फुलशेती प्रकल्पाची त्यांनी पाहणी करत, उत्पादनाचे तंत्रज्ञान, अर्थकारण आणि विक्री व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा केली.
फुलशेती क्लस्टरचा यशस्वी नमुना-
या भेटीदरम्यान पाटणसावंगी परिसरातील अनेक फुलशेती उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निशिगंधा रेशीम फळे शेतकरी उत्पादक कंपनी, पाटणसावंगी आणि कृषी विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून एमजीएनआरईजीएस अंतर्गत फुलशेतीचा एक मजबूत क्लस्टर तयार झाला आहे, हे दिलासादायक चित्र आयुक्तांनी यावेळी पाहिलं.
शेतकऱ्यांशी थेट संवाद-
श्री. मांढरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना गुलाब लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्नाचे नियोजन आणि विक्रीची साखळी यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. गुलाब फुलशेतीला शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासोबत मार्गदर्शनही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
अधिकारी आणि शेतकऱ्यांची उपस्थिती-
या प्रसंगी श्री. प्रतीक मोहोळ (युवा शेतकरी) यांनी माननीय आयुक्तांचे स्वागत केले. यावेळी श्री. उमेश घाडगे (विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर), श्री. रवींद्र मनोहरे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर), डॉ. अर्चना कडू (प्रकल्प संचालक, आत्मा), श्री. सोमनाथ साठे (उपविभागीय कृषी अधिकारी), तसेच श्री. रोशन डंभारे, श्री. अनिल खरपुरीये आदी अधिकारी उपस्थित होते.
प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग-
यावेळी श्री. नरेंद्र महले (शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते), श्री. अमित गुड्डे, श्री. महेंद्र जनबंधू, श्री. सुभाष वानखेडे आणि परिसरातील अनेक फुलशेती उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, फुलशेतीच्या क्षेत्रात नवे प्रयोग आणि शक्यता उघडल्या आहेत.संपूर्ण उपक्रमातून फुलशेतीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा मार्ग कृषी विभाग उघडत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.