मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत तब्बल ४८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पुरुष लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी थेट डीबीटी प्रणालीच्या पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे जमा होतात, या योजनेत कडक पडताळणी प्रक्रिया आहे. तरीही पुरुषांच्या खात्यांमध्ये पैसे कसे जमा झाले? याचा खुलासा झाला नाही हे आश्चर्यकारक आहे. मग ही यंत्रणा कुठे अयशस्वी ठरली?”
मंत्र्यावर नव्हे, पण सरकारवर ठपका-
सुळे यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर कोणताही वैयक्तिक आरोप न करता, “मी खोटे आरोप करत नाही. पण या घोटाळ्याची सामूहिक जबाबदारी सरकारने घ्यायला हवी,” अशी मागणी केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या अधिकृत आकडेवारीतूनच हा ४८०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. “या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी झाल्या आहेत आणि यामुळे सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमावरच प्रश्न निर्माण होतो,” असेही त्या म्हणाल्या.
घोटाळ्याचे नेमके स्वरूप अद्याप अस्पष्ट-
हा घोटाळा नेमका कुणी केला, त्यामागे कोण आहेत, यात सरकारी यंत्रणांचा सहभाग आहे का – याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र, याप्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून चांगलाच घेराव घातला जाणार, हे निश्चित.
राजकीय वर्तुळात खळबळ-
या आरोपामुळे आगामी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेले मुद्दे केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरते मर्यादित नसून, सरकारी यंत्रणेतील प्रणालीच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत.