नवी दिल्ली : डिजिटल माध्यमांवर वाढत्या अश्लीलतेला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ALTBalaji, ULLU, Desi Clips यांसारख्या अनेक OTT अॅप्सवर तसेच त्यांच्या संबंधित वेबसाईट्सवर तात्काळ प्रभावाने बंदी लागू केली आहे.
सरकारने हा निर्णय ‘सार्वजनिक नैतिकता’ जपण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. या अॅप्सच्या माध्यमातून सॉफ्ट पॉर्न आणि लैंगिकदृष्ट्या अश्लील कंटेंट मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट सेवा पुरवठादारांना (ISPs) स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या अॅप्स आणि त्यांच्या वेबसाईट्सवर पूर्णपणे ब्लॉक करण्यात याव्या, जेणेकरून नागरिकांना यामधील कंटेंट पाहता येणार नाही.
सरकारने ज्या OTT अॅप्सवर बंदी घातली आहे त्यात ALTBalaji, ULLU, Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchul App, MoodX, NeonX VIP, Fugi, Mojflix, Triflicks यांचा समावेश आहे. एकूण २५ OTT प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली आहे.
ही कारवाई आयटी अॅक्ट 2000 मधील कलम 67 आणि 67A, भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 294 आणि महिलांचे अश्लील चित्रण (प्रतिबंध) अधिनियम 1986 अंतर्गत करण्यात आली आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही सर्व अॅप्स वारंवार नियमांचं उल्लंघन करत होत्या. शिवाय, सर्वोच्च न्यायालयानेही अशा OTT अॅप्सवर कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते, जे ‘मनोरंजन’च्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न प्रसारित करत आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या अश्लील कंटेंटवर अंकुश येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.