मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील ८ मंत्र्यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठं ‘धक्कातंत्र’ राबवणार असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे गट)च्या सामनातून करण्यात आला आहे.
सामनाने दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य फेरबदलात शिंदे गट व भाजपमधील काही मंत्र्यांना मंत्रीपद गमवावं लागू शकतं. या यादीत माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, नरहरी झिरवळ, नितेश राणे, जयकुमार गोरे, भरत गोगावले आणि दादा भुसे यांची नावं असल्याचे सामनाने स्पष्टपणे नमूद केलं आहे.
वादग्रस्त कारभार आणि आरोप बनले कारण-
या मंत्र्यांवर वादग्रस्त निर्णय, वक्तव्ये, भ्रष्टाचाराचे आरोप किंवा कामगिरीतील अपयश ही कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
माणिकराव कोकाटे यांना विधानसभेत रम्मी खेळताना पाहिलं गेलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
संजय शिरसाट यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळल्याचं प्रकरण चर्चेत राहिलं आहे.
योगेश कदम सावली बारप्रकरणामुळे अडचणीत सापडले होते.
नितेश राणे यांचे सातत्याने वादग्रस्त विधानं चर्चेचा विषय ठरले आहेत.
जयकुमार गोरे यांच्यावर महिलेकडून गंभीर आरोप झाले होते.
नरहरी झिरवळ यांच्यावर मतदारसंघात सक्रिय नसल्याचे आरोप आहेत.
दादा भुसे यांचं शालेय शिक्षण खात्यावरील काम अपयशी ठरल्याचे म्हटलं जात आहे.
भरत गोगावले यांच्याबाबत स्थानिक पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
मोठे बदल संस्थात्मक पातळीवरही?
सामनाच्या वृत्तानुसार, या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात प्रवेश दिला जाऊ शकतो, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शिंदे गटामध्येही असंतोष वाढत चालल्याने, केवळ मंत्र्यांची नव्हे तर संस्थात्मक पातळीवरही मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ-
या शक्यतेमुळे महायुतीतील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मोठं राजकीय पाऊल उचलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी गोटात यामुळे अस्वस्थतेचं वातावरण आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा फेरबदल केल्यास, पक्षाची प्रतिमा आणि कार्यक्षमता दोन्ही सुधारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे.