
नागपूर : शहरात चोरीच्या घटना वाढत असताना अजनी पोलिसांनी एक मोठे यश मिळवले आहे. मौजमस्ती आणि खर्चासाठी वाहन चोरी करणाऱ्या एका शातिर चोरट्याला आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांकडून ६ दुचाकी आणि १ कार असा एकूण ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अलीकडच्या काही दिवसांपासून शहरात विविध भागांतून वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजनी पोलिसांनी विशेष तपास मोहीम सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टोळीचा म्होरक्या आकाश रामटेके याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन अल्पवयीन साथीदारांची माहिती दिली, त्यांनाही नंतर अटक करण्यात आली.
पोलिस तपासात उघड झाले की, ही टोळी फक्त मौजमस्ती आणि स्वतःच्या खर्चासाठीच चोरी करत होती. चोरी केलेली वाहने ही शहरात फिरण्यासाठी आणि आपल्या हौशीखातर वापरत होते.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एक कारदेखील आहे, जी त्यांनी अजनीच्या विश्वकर्मा नगर येथून चोरी केली होती. ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा फर्यादी मोहन अंबुलकर आपल्या कुटुंबासह मुंबईला गेले होते आणि घराला कुलूप लावले होते. पोलिसांनी गुन्ह्याचा अधिक तपास सुरू केला असून, आणखी काही चोरीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.










