मुंबई: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (हिंद स्वराज्य संघ) तर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार १ ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे एका भव्य समारंभात प्रदान केला जाणार आहे.
गडकरी यांना देशाच्या विकासात आणि राष्ट्रनिर्माणात केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. समारंभाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश आहे. पुरस्काराचे वितरण डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते होईल.
गडकरींची निवड का?
डॉ. रोहित टिळक यांनी गडकरी यांची निवड का केली याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, “गडकरींनी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (PPP) मॉडेलचा प्रभावी वापर करून देशभर रस्त्यांचं जाळं विस्तारलं, ‘नमामी गंगे’सारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना दिली आणि स्वदेशी वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यांची नेतृत्वशैली ही लोकमान्य टिळक यांच्या विचारधारेशी सुसंगत आहे.”
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, हरित इंधनाचा प्रसार, आणि देशभरातील इन्फ्रास्ट्रक्चर क्रांतीमुळे गडकरी यांना हा पुरस्कार देणे योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरस्काराची परंपरा आणि स्वरूप-
१९८३ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि १ लाख रुपयांची रोख रक्कम प्रदान केली जाते. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, डॉ. के. सिवन, सुधा मूर्ती, डॉ. सायरस पुनावाला यांसारख्या नामवंत व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
या वर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरवशाली परंपरेचा आढावा घेणारा विशेष ग्रंथ प्रकाशित होणार असून, त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या ग्रंथात आजवर सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तींचे कार्य आणि योगदान अधोरेखित केले जाईल.