मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा जुलै महिन्याचा आर्थिक हप्ता अद्याप लाभार्थींना प्राप्त झाला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार हा हप्ता जुलैच्या अखेरीस किंवा ५ ऑगस्टपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोट्यवधी महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जून महिन्यापर्यंतची रक्कम नियमितपणे जमा होत होती. मात्र, जुलै महिन्यात विलंब झाल्याने अनेक महिलांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.
२ कोटींहून अधिक महिलांना मिळणार मदत-
गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. सध्या २ कोटी ३४ लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपयांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
राज्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून योजना अखंड सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुका पार पडेपर्यंत छाननी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकांनंतर सुरू होणार पात्रतेची छाननी-
महिला व बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार, अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेतून वगळण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा मागवण्यात आला होता. मात्र, सध्या निवडणुकांमुळे ही छाननी पुढे ढकलण्यात आली आहे.
या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत सर्व नोंदणीकृत महिलांना दरमहा निधी मिळत राहील, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे.