सावनेर :सावनेर शहरातील कलमेश्वर रोडवरील महाकाली अॅक्वा वॉटरच्या मागील बाजूस असलेल्या बनकर लेआऊट येथील शिवमंदिर व हनुमान मंदिराच्या परिसरात एक अनोखी घटना घडली आहे. तेथील गुल्लर (उंबर) झाडाच्या खोडातून मागील पाच दिवसांपासून पाण्याची धार अखंड वाहत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेला काहीजण ईश्वरी चमत्कार मानत असून मंदिरात पूजा-अर्चना सुरू झाली आहे. परिसरात या घटनेमुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि महाकाली अॅक्वा वॉटरचे संचालक वासुदेव मेंहदोळे यांनी या घटनेची माहिती आमच्या स्थानिक प्रतिनिधीला दिली. त्यानंतर घटनास्थळी भेट दिली असता खरोखरच गुल्लरच्या झाडाच्या एका कापलेल्या फांदीतून पाण्याची धार वाहताना आढळली. नागरिक या घटनाकडे भोलेबाबाच्या चमत्कारासारखे पाहत असून, परिसरात एक वेगळ्याच प्रकारचे श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेचे पहिले साक्षीदार कोलबा मंडलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, १८ जुलै रोजी या झाडाच्या झाडाझडतीत काही फांद्या कापण्यात आल्या होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी एका कापलेल्या फांदीतून पाण्याचे थेंब टपकताना दिसले. सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून ही धार अधिक तीव्र झाली. सर्व फांद्या कापण्यात आल्या असल्या तरी केवळ एका फांदीतूनच पाण्याचा प्रवाह सुरू आहे, जे भाविकांमध्ये कुतूहलाचे कारण बनले आहे.
भारतीय संस्कृती आणि पुराणांनुसार विविध वृक्षांचे धार्मिक महत्त्व आहे. जसे वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा वास मानला जातो, तसेच गुल्लरच्या झाडात धनसंपत्तीचे देवता कुबेर यांचा वास असल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे काहीजण या घटनेला धार्मिक आणि दैवी चमत्कार मानत आहेत, तर काहीजण याला नैसर्गिक घटना समजत आहेत.
सध्यातरी श्रावण महिन्यात सुरू असलेल्या या घटनेमुळे परिसरात उत्सुकता आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक पवित्र मानून त्या पाण्याचा स्पर्श करत आहेत, काहीजण ते घर घेऊनही जात आहेत.