नागपूर – नागपूरच्या आय.सी. चौकातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री सुमारे २.०० ते २.३० दरम्यान दोन अज्ञात युवकांनी घुसखोरी करत एका विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
सदर विद्यार्थिनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून तिने प्रसंगावधान राखून आरडाओरड केली. त्यामुळे प्रकार उघडकीस येताच आरोपी तिचा मोबाईल हिसकावून घटनास्थळावरून फरार झाले. या गंभीर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसतिगृहात सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण अभाव-
या वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक अथवा कोणतीही तत्काळ सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नाही. विद्यार्थिनीने ही घटना तत्काळ वसतिगृहाच्या वार्डनला सांगितली असता, ना वार्डनने तातडीने पोलीसांना कळवले, ना कोणतीही ठोस कृती केली गेली.
पोलिसांकडूनही दिरंगाई, FIR दाखल न झाल्याचा आरोप-
विद्यार्थिनी व सहकाऱ्यांनी जेव्हा MIDC पोलीस ठाण्याशी संपर्क साधला, तेव्हा पोलिसांनी कोणतीही तातडीची कारवाई न करता FIR नोंदविण्यास टाळाटाळ केली, तसेच आरोपींना पकडण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
प्रशासनाचा प्रकार दडपण्याचा प्रयत्न?
या प्रकरणात वसतिगृह प्रशासन आणि पोलिस प्रशासन दोघांकडूनही गंभीर दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थिनींच्या नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचा निषेध आणि आंदोलनाची हाक-
या घटनेच्या निषेधार्थ २३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता MIDC पोलीस ठाण्यावर, त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वसतिगृह प्रशासन कार्यालय येथे जाब विचारण्यासाठी निदर्शने करण्यात येणार आहेत.
या आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहर व ग्रामीण विभागातील पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.या घटनेतील आरोपी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू,” असा इशारा मनिष बोरकर (जिल्हाध्यक्ष, युवक आघाडी), मंगेश वानखेडे (अध्यक्ष, नागपूर शहर) आणि सिध्दांत पाटील (कार्याध्यक्ष, नागपूर शहर) यांनी दिला आहे.