नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी, २२ जुलै रोजी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. विमानतळ प्रशासनाला ईमेलद्वारे ही धमकी मिळताच तात्काळ सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली.
धोक्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसरात श्वानपथक, बॉम्ब शोधक पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी तपासणी सुरू केली. आतापर्यंत विमानतळाच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही काळासाठी नागरिकांना विमानतळ परिसरात प्रवेश मर्यादित करण्यात आला होता. मात्र, कोणतीही गंभीर घटना घडलेली नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पोलिस आणि प्रशासन या धमकीचा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत असून तपास सुरू आहे. विमानतळावर नेहमीप्रमाणे उड्डाणांची नियमितता सुरळीत आहे.