नागपूर : नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. “जर तुमच्याकडे खरोखरच काही ठोस पुरावे असतील, तर ते सभागृहात सादर करा. केवळ आरोप करून जनतेला गोंधळात टाकू नका,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
विरोधकांकडून जनतेची दिशाभूल-
बावनकुळे म्हणाले, “हे सगळं विरोधकांचं नियोजित नाट्य आहे. त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. जर असते, तर ते कधीच उघड झाले असते.” विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणावर आपली बाजू मांडली असून, यापुढेही सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
माहितीची देवाणघेवाण एका गटातच-
बावनकुळे यांनी संजय राऊत, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “एका विशिष्ट गटातच माहिती फिरतेय. तिचा गैरवापर करून वातावरण दूषित केलं जातंय. हे टीआरपीसाठी चाललेलं राजकारण आहे,” असं ते म्हणाले.
फक्त नाव घेऊन बदनामी नको-
गिरीश महाजन यांच्यावर विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, सामाजिक आणि राजकीय वावर असले की अनेक लोकांशी संबंध येतात. त्यामुळे फक्त कोणाच्या ओळखीवरून आरोप करणं चुकीचं आहे. जर काही तथ्य असेल, तर ते द्या – अन्यथा फक्त नाव घेऊन बदनामी करणं थांबवा.