नागपूर – शहरात अंमली पदार्थांचा विळखा किती खोलवर पोहोचला आहे, याचा धक्कादायक नमुना रविवारी सकाळी समोर आला. दक्षिण नागपूरमधील माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार (२९) याला महिंद्रा थार गाडीसह एमडी ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. गणेशपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडून १६.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल आणि गाडी अशा एकूण १८.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
‘ड्रग्ज’च्या धंद्यातला संकेत-
गोपनीय माहितीवरून गणेशपेठ पोलिसांनी रविवारी सकाळी गणेशपेठ बसस्थानकाजवळ नाकाबंदी केली होती. त्यावेळी एनआयटी कॉम्प्लेक्स रोडवरून जात असलेली एक काळी थार गाडी (MH-45-AV-4554) थांबवण्यात आली. तपासणी दरम्यान चालकाच्या खिशातून चार झिपलॉक पिशव्यांमध्ये एमडी ड्रग्ज सापडले. चालकाची ओळख संकेत बुग्गेवार, वय २९, आशीर्वाद नगर, असा झाली. तो भाजपचे माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले.
ड्रग्ज डीलरचा ‘फिटनेस’चा मुखवटा-
संकेत हा एक फिटनेस फ्रीक असून त्याचे शरीर पाहता कोणीही त्याला ड्रग्ज विक्रेता समजणार नाही. पोलिस सूत्रांनुसार, तो स्वतः प्रोटीन पावडरबरोबर एमडी ड्रग्जचे सेवन करत होता आणि त्याचं स्वतःचं सप्लिमेंट शॉप देखील आहे. मात्र व्यायामातून शरीर घडवणाऱ्या संकेतने नशेच्या मार्गावर स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.
राजकीय घराणं चौकशीत, बाप-लेकावर संशय-
संकेतची अटक होताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्याचे वडील अजय बुग्गेवार हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक असून, एकेकाळी माजी आमदारांचे जवळचे समजले जात होते. पानठेलेवरून राजकारणात आलेल्या अजय यांची प्रतिमा आता मुलाच्या गुन्ह्यामुळे धोक्यात आली आहे.
फरार साथीदार प्रणय बाजारेचा शोध सुरू-
संकेतने पोलिसांना सांगितले की, तो प्रणय बाजारे (२५) या तरुणासोबत मिळून ड्रग्ज विक्री करत होता. प्रणय सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हे दोघेही ड्रग्ज विक्रीला एक बिझनेस मॉडेलप्रमाणे चालवत होते. पोलिस आता त्यांच्या सप्लायर व ग्राहकांचे नेटवर्क उघड करण्यासाठी तपास करत आहेत.
कडक कलमांखाली गुन्हा, १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी-
गणेशपेठ पोलिसांनी संकेतवर NDPS कायद्यातील कलम ८(क), २१(ब), २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई अपर आयुक्त राजेंद्र दाभाडे, उपायुक्त राहुल मदने, एसीपी अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक युनूस मुलानी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
नशामुक्त नागपूर मोहिमेला धक्का की दिशा?
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या नशाविरोधी मोहिमेला या अटकेमुळे नवे वळण मिळाले आहे. मात्र ही घटना दाखवून देते की, ड्रग्जचा विळखा आता फक्त गल्लीबोळांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर राजकारणाच्या दारापर्यंत पोहोचला आहे.पोलिसांचा तपास पुढे काय उघड करतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.