नागपूर : शहरातील बजाजनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी उघडकीस आणत २३ वर्षीय तरुणाला अटक केली. आरोपीकडून ३.१४ किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत ₹८६,००० असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई ११ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली. महाराष्ट्र शासन कार्यालयासमोर, कृपलानी चौक ते माता कचहरी चौक दरम्यान एक तरुण काळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या नजरेत आला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव रोहित अजित रंगारी (वय २३, रा. झेंडा चौक, पाणी टाकी जवळ, इतवारी) असे सांगितले.
पोलिसांनी पंचासमक्ष त्याची बॅग तपासली असता त्यामध्ये ३.१४ किलो हिरवट रंगाचे अंमली पदार्थ (गांजा) आढळून आले. त्याच्यासोबत असलेला मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी आर्थिक फायद्यासाठी गांजा बाळगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(B), आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजीराव राठोड, झोन-१ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी, तसेच सोनगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेलके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय मणकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोर्कर, तसेच पोलीस शिपाई ऋतेश मालगुळवार, संजय मानसकर, योगेश्वर आदींच्या पथकाने केली.