मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चावरून निर्माण झालेल्या वादावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट पोलिस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत चौकशीचे आदेश दिले आहेत.
८ जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाने मराठी भाषेच्या प्रश्नावर मीरा रोड येथे मोर्चा आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आणि पहाटेच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. या घटनेने संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
अमराठी मोर्चाला परवानगी, मग मराठींना का नाही?
फडणवीस यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेतली. “अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा काढला जातो, तो चालतो; पण मराठी लोकांचा मोर्चा अडवला जातो, हे दुहेरी धोरण आहे,” असा सवाल त्यांनी केला. त्यांनी यासोबतच पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा उल्लेख करत सांगितले की, वाद नको म्हणून मार्ग बदलण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून आला होता.
मात्र, तरीही मोर्चाला नकार दिला गेला. “या निर्णयामागे कोणाचा राजकीय दबाव होता का? की पोलिसांनी एकतर्फी निर्णय घेतला?” याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरनाईकांचा पोलिसांवर थेट आरोप-
शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांनीही पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. “व्यापाऱ्यांना मोर्चा काढू देता, पण मराठी एकीकरण समितीला का नाही? पोलीस नेमके कुणाच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांना अडवत होते?” असा रोखठोक प्रश्न त्यांनी विचारला.
सरनाईक यांनी गृहखात्याच्या परवानगीशिवाय कोणी आदेश दिले, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही केली.
सरकारच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह-
या सर्व प्रकारामुळे सरकारच्या तटस्थतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला असून, पोलिस प्रशासनाचा निर्णय केवळ कायदासंविधानाच्या चौकटीत होता की राजकीय हेतूने प्रेरित होता, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.