-एन.डी.पी.एस. पथकाची कारवाई
नागपूर :शहरातील धरमपेठ परिसरातील महफिल स्मोक शॉपवर एन.डी.पी.एस. पथकाने मोठी कारवाई करत ई-सिगारेट, परदेशी सिगारेट आणि हुक्का संबंधित साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, माता मंदिर रोडवरील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कसमोर असलेल्या महफिल स्मोक शॉपमध्ये ई-सिगारेट व हुक्कासंबंधित साहित्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची गुप्त माहिती एन.डी.पी.एस. पथकाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे 1 जुलै रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी 17 वेप ई-सिगारेट्स, 17 परदेशी सिगारेट पाकिटे, हुक्का पॉट्स, हुक्का पाईप्स, विविध फ्लेवर्स, एक दुचाकी, चार मोबाईल फोन, DVR आणि रोख रक्कम असा एकूण ₹3,36,070 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची नावे वैभव विकास कांबळे (27) आणि शुभम विकास कांबळे (31), दोघे रा. बाबा बुद्ध नगर, पाचपावली, नागपूर अशी आहेत. या दोघांविरोधात ई-सिगारेट प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4, 5, 7, 8 तसेच कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.