मुंबई :मराठी भाषेवर अन्याय करणाऱ्या त्रिभाषा धोरणाच्या विरोधात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आता लढ्याच्या विजयाचं जल्लोषात स्वागत करण्याचं आवाहन केलं आहे. येत्या ५ जुलै रोजी वरळी डोम येथे आयोजित विजयी मेळाव्याचं निमित्त साधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकातून मराठी जनतेला आपल्या उत्साहात सामील होण्याचं आवाहन केलं आहे.
“सरकारला झुकावलं का? तर हो, झुकवलं! कोणी? मराठी माणसांनी!” — अशा शब्दांत सुरू होणाऱ्या पत्रकात ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलं आहे की, लढा आम्ही दिला, पण विजय हा तुमचा आहे. आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचा आहे. गुलाल उधळत, वाजतगाजत या मेळाव्यात सहभागी व्हा, असं ते म्हणाले.
मेळाव्याचा कार्यक्रम-
पूर्वी नियोजित मोर्चा रद्द करून, हिंदी सक्तीच्या निर्णयावर सरकारने माघार घेतल्यानंतर, हा मेळावा विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. वरळी डोम येथे दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, दोन्ही ठाकरे बंधू प्रमुख उपस्थितीत असतील.
संजय राऊत काय म्हणाले?
या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. आधी हा कार्यक्रम शिवतीर्थावर होणार होता, पण सरकारकडून परवानगी नाकारली गेल्याने डोम हा पर्याय स्वीकारण्यात आला.”
राऊतांनी स्पष्ट केलं की, हा कार्यक्रम केवळ मनसे-शिवसेनेचा नाही, तर राज्यातल्या सर्व हिंदी सक्तीविरोधी शक्तींची एकजूट आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे पक्ष यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. “महाराष्ट्रावर दिल्लीतून जेव्हा जेव्हा हल्ले झाले, तेव्हा महाराष्ट्राने ठामपणे आवाज उठवला आहे. यावेळीही तोच निर्धार दाखवायचा आहे,” असं सांगून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ५ जुलैचा हा मेळावा केवळ एका लढ्याचा शेवट नाही, तर मराठी अस्मितेच्या विजयाचा आरंभ आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्य एकवटल्याचा हा क्षण साजरा करण्यासाठी, “सगळ्यांनी एकत्र या आणि हा जल्लोष तुमचाच आहे” – असं ठाकरे बंधू स्पष्टपणे सांगतायत.