नागपूर : मिशन नवचेतनाअंतर्गत नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पर्वावर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ११४ डिजीटल क्लासरुम तयार करण्यात आल्या आहेत. या डिजीटल क्लास रुममध्ये इंटरॅक्टीव्ह पॅनेल आणि कॅाम्प्युटर लॅब ची सुविधा आहे. त्यामुळे पहिली ते बारावी वर्गापर्यंतच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आता डिजीटल बोर्डच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे.
‘मिशन नवचेतना’ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लास रुम तयार करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानासह शिक्षण मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थी आधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे गिरविणार आहेत.
याबाबत पूर्वतयारी म्हणून नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला शाळेतील शिक्षकांना दोन दिवसीय स्मार्ट बोर्डचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात मंगळवारी (ता.१७) अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., यांच्या उपस्थितीमध्ये बजेरीयातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई–लायब्ररीतील सभागृहात करण्यात आली. यावेळी मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्नील लोखंडे, सहायक शिक्षणाधिकारी श्री.संजय दिघोरे, शाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेभुर्णे, शिक्षण विभागाचे समन्वयक श्री. भारत गोसावी उपस्थित होते.
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, विद्यार्थी तंत्रज्ञानस्नेही व्हावे, तसेच शिक्षकांना तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून मुंबईतील प्रशिक्षक डॉ. प्रभात तिवारी आणि राजू काळबांडे यांच्यामार्फत स्मार्ट बोर्डचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. दोन दिवसात एकूण चार टप्प्यात 200 शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या दिवशी 54 शिक्षकांना स्मार्ट बोर्डमधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कसे, बोर्डमधील विविध कंटेट कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षकांनी स्मार्ट बोर्डमधील विविध टूल्स, नोटपॅड, देवनागरी व इंग्रजी भाषा, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांना प्रशिक्षित केले. यावेळी शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे प्रशिक्षकांनी दिले.