नागपूर : सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत “प्रेम”, “साखरपुडा”, “लग्न” आणि “नफ्याची गुंतवणूक” अशा गोड शब्दांच्या आड लपून महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्या एका शातीर भामट्याला अखेर नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. कल्पेश शशिकांत कक्कड (वय ४२, रा. कांदिवली, मुंबई) असं या आरोपीचं नाव असून, तो सध्या नागपूरच्या जरीपटका पोलिसांच्या ताब्यात आहे.
फेसबुकवरून ओळख, प्रेमाच्या नावाखाली फसवणूक-
जरीपटका परिसरात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेशी फेसबुकवरून ओळख करून घेतलेल्या कल्पेशने हळूहळू तिला विश्वासात घेऊन साखरपुड्यापर्यंत नातं नेलं. मात्र, जानेवारी २०२४ मध्ये तिच्या राहत्या घरी जाऊन गुंगीकारक औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप तिच्याकडून करण्यात आला आहे.
याच महिलेला आणि तिच्या भावाला शेअर बाजारातून नफ्याचं आमिष दाखवत तब्बल १२ लाखांची फसवणूक करण्यात आली. लग्नाच्या नावाने टाळाटाळ करत कल्पेशने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये साठवले व तिला सातत्याने धमकावत राहिला.
पुणे क्राईम ब्रांचचा सखोल तपास,दोन राज्यांत गुन्ह्यांची नोंद
या प्रकरणाची सुरुवात पुणे क्राइम ब्रांचने दाखल केलेल्या झिरो एफआयआरने झाली. त्यानंतर गुन्ह्याचा तपास नागपूर आणि हैदराबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सध्या नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक करत ३ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड (PCR) घेतला असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच हैदराबाद पोलिसही त्याला ताब्यात घेणार आहेत.
मोबाईलमध्ये सापडले अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ-
तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधून अनेक महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कल्पेशने अशा प्रकारे फसवलेल्या महिलांची संख्या किती असू शकते, याचा तपास वेगात सुरू आहे. आरोपीविरोधात IPC कलम ३७६, ३७६(२)(एन), ३२८, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.