नागपूर : पाकिस्तानमध्ये गेलेल्या नागपूरच्या सुनीता जामगडे प्रकरणात आता कारगिल पोलिसांचाही प्रवेश झाला आहे. कारगिल जिल्ह्यातील एका विशेष पोलिस पथकाने तपासासाठी नागपूरमध्ये हजेरी लावली असून, लवकरच प्रोडक्शन वॉरंटवर सुनीता जामगडेला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ४३ वर्षांची सुनीता जामगडे ४ मे रोजी आपल्या १२ वर्षांच्या मुलासह ‘कोर्टच्या कामासाठी’ पंजाबला गेली होती. मात्र १४ मे रोजी ती कारगिलच्या शेवटच्या हुंदरमन गावाजवळून बेपत्ता झाली. विशेष म्हणजे, तिने आपल्या मुलाला स्थानिक हॉटेलमध्ये सोडून दिले होते. स्थानिक पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी मुलाला शोधून त्याच्याकडून चौकशी केली असता तो नागपूरचा असल्याचे समोर आले.
ही माहिती समजताच कारगिल पोलिसांनी नागपूर पोलिसांशी तसेच सुनीता यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. दरम्यान, सुनीता नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले आहे. पाकिस्तान रेंजर्सने तिला ताब्यात घेऊन सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) सुपूर्द केले. त्यानंतर अमृतसर पोलिसांनी तिला अटक केली.
हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने देशातील विविध तपास यंत्रणांनी सुनिताची कसून चौकशी सुरू केली आहे. सध्या ती नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कारगिल पोलिसांना तिच्या हालचाली, हेतू आणि संपर्कांबाबत सखोल तपास करायचा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सुनीताला अमृतसरहून नागपूर न्यायालयात हजर करण्यासाठी नागपूर पोलिसांनी एका अधिकाऱ्यासह दोन महिला पोलिस अधिकाऱ्यांची विशेष टीम पाठवली होती. न्यायालयीन सुनावणीनंतर तिला नागपूर जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, कारगिल पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज दाखल केला असून, त्यावर न्यायालय लवकरच निर्णय देईल. सुनीता जामगडे पाकिस्तान का गेली आणि यामागे कोण आहे, याचा तपास तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान बनले आहे.