नागपूर: गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील टकली परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कामगार नगर झोपडपट्टीजवळील नाल्यात एक भटका कुत्रा नवजात शिशुचा भ्रूण तोंडात घेऊन फिरताना दिसला.
विशेष म्हणजे त्या कुत्र्याने भ्रूणाचे हात आणि डोके खाल्ले असल्याची माहिती आहे. या दृश्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भ्रूण ताब्यात घेतला व पुढील तपास सुरू केला.
भ्रूण शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, हा भ्रूण नाल्यात कोणी आणि का फेकला याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे, तसेच स्थानिक रहिवाशांकडूनही माहिती घेतली जात आहे.
या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे की, या प्रकरणाशी संबंधित कुणाकडेही कोणतीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.पुढील तपास सुरु आहे.











