नागपूर – पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेने (SSB) मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई नागपूर मध्य रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील गेट क्रमांक १ जवळ मंगळवारी रात्री ८:१५ वाजल्यापासून ते बुधवारी पहाटे १:४० दरम्यान करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण ओडिशा राज्यातील असून इतर दोन जण मुंबईतील आहेत. त्यांच्याकडून एकूण १७.५४ किलो गांजा, तीन मोबाईल फोन आणि १७०० रोख रक्कम असा एकूण ₹३,९७,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची ओळख पटवली असून त्यामध्ये ओडिशा येथील पन्नोकीमाल गावातील बिश्वनाथ चतुर्भुज साहू (२५) आणि बाळांगीर जिल्ह्यातील गोयंताळा येथील सिमाद्री गारीबा कलसाये (२३) यांचा समावेश आहे.
तसेच मुंबईतील कळंबोली, पनवेल येथील विश्वजीत विनोद चौधरी (२३) आणि सुरज मेहिलाल नाविक (२५) यांनाही अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण एकमेकांच्या संपर्कात येत गांजा तस्करी करण्याच्या उद्देशाने नागपूर येथे आले होते.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात हेडकॉन्स्टेबल प्रकाश, लक्ष्मण, अजय आणि पोलीस शिपाई अश्विन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम, नितीन तसेच महिला पोलीस शिपाई पुनम शेंडे सहभागी होते. तपासादरम्यान हे आरोपी गांजा घेऊन नागपूरमार्गे अन्य राज्यात जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सीताबर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८(क), २०(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून गांजाचा मूळ स्रोत आणि वितरणाचे नेटवर्क शोधण्याचे काम सुरू आहे.