नागपूर – शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडेवाडी येथील अंतुजी नगरमध्ये सोमवारी एक दु:खद आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. घराच्या छतावर खेळत असलेल्या अवघ्या ४ वर्षांच्या अनम शमशाद खान या चिमुरडीचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण खान कुटुंब हादरून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शमशाद खान हे खाजगी चालक असून ते आपल्या पत्नी आणि दोन मुलींसोबत अंतुजी नगर येथे राहतात. सोमवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अनम घराच्या छतावर खेळत असताना तिथे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेली. दुर्दैवाने त्या टाकीवर झाकण नव्हते. खेळता खेळता अनम टाकीवर चढली आणि त्यात पडली.
दोन तासांनी अनम घरी कुठेही दिसून न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरु केला. छतावरील पाण्याच्या टाकीत पाहिल्यानंतर अनम पाण्यात आढळली. तात्काळ तिला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.