नागपूर : गेल्या सहा महिन्यांपासून बुटीबोरी फ्लाईओवर वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी बुटीबोरीतील उड्डाणपूलाचा एक भाग कोसळल्यानंतर तब्बल सहा महिने उलटले तरी नागरिकांना अद्यापही पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र अखेर, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने दिलासा देणारी माहिती दिली असून, पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यासंदर्भात NHAI चे मुख्य महाव्यवस्थापक राकेश प्रकाश सिंह यांनी रेडिओ मिरचीचे फरहान यांच्याशी संवाद साधला.
१५ मे पूर्वी खुला होणार फ्लाईओवर –
NHAI चे मुख्य महाव्यवस्थापक राकेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे की हा पूल येत्या १५ मे पूर्वी वाहतुकीसाठी खुला केला जाईल. जाड वाहनांमुळे पुलाचा एक भाग खचला आणि तो कोसळून पडला. त्यानंतर पासून पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र तब्बल सहा महिने उलटले तरी पूल वाहतुकीसाठी खुला झालेला नव्हता. पुलाच्या वरच्या भागाचे मजबुतीकरण कार्बन फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर (CFRP) शीट्सच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. कँटिलिव्हर बीमची दुरुस्ती पूर्ण झाली असून, लवकरच स्ट्रक्चरल लोड टेस्ट होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केला जाईल, असे सिंग म्हणाले.
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल –
बुटीबोरीदरम्यान वाहतूक संथगतीने सुरू असून, परिसरातील उद्योगधंद्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पर्यायी मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.पूल वेळेत खुला झाला, तर नागपूर-वर्धा मार्गावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. नागरिकांची एकच अपेक्षा यावेळी आश्वासन खरे ठरावे आणि “लवकरच” हा शब्द पुन्हा ऐकावा लागू नये.