नागपूर :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल आज प्रसिद्ध करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के इतका लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १.४९ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि त्यामधून १३,०२,८७३ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाने सर्वाधिक ९६.७४ टक्के निकालासह पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. यंदाही मुलींनीच यशाची बाजी मारली असून त्यांच्या निकालाचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक आहे.
विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे:
कोकण: ९६.७४%
कोल्हापूर: ९३.६४%
मुंबई: ९२.९३%
छत्रपती संभाजीनगर: ९२.२४%
अमरावती: ९१.४३%
पुणे आणि नागपूर: प्रत्येकी ९१.३२%
नाशिक: ९१.३१%
लातूर: ८९.४६%