नागपूर : शहरातील इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील मेडिकल चौकाजवळ असलेल्या VR मॉलमध्ये रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरून एका युवकाने अचानक उडी घेतली, त्यामुळे मॉलमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी युवकाला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासात या युवकाची ओळख नवीन नगर पारडी येथील रहिवासी गणपत राजेंद्र तिडके (वय २० वर्षे) अशी झाली आहे.
वैद्यकीय तपासणीत उडी मारल्यामुळे युवकाच्या उजव्या पायाला एकाहून अधिक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने इतक्या उंचीवरून पडूनही त्याचा जीव वाचलेला आहे. सध्या त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, युवकाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमामवाडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून युवकाने हे धाडसी पाऊल उचलण्यामागची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.