नागपूर: नागपूर शहरात खूनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, रोज होणाऱ्या खूनांमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगनाडे चौक परिसरात एका व्यक्तीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव नितेश दुपारे (वय ३८) असून, तो गंगाबाई घाट येथे राहत होता. काही अज्ञात व्यक्तींनी अचानक नितेशवर हल्ला करून त्याच्यावर चाकूने अनेक वार केले, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोतवाली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या आरोपी कोण होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही आणि खूनामागील कारणही अस्पष्ट आहे.
नागपूर शहरात वाढत्या खूनाच्या घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोतवाली पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलीस करत आहेत.