नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात शनिवारी पहाटे एक अजब घटना घडली असून, कोसे लेआऊट भागात एका घरावर आकाशातून धातूचा प्रचंड मोठा तुकडा पडल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे पहाटे चारच्या सुमारास जोरदार आवाज होऊन स्थानिक रहिवाशांची झोपमोड झाली. काही वेळातच लोकांनी बाहेर येऊन पाहिले असता, एका घराच्या छतावर धातूचा जड तुकडा कोसळलेला आढळून आला.
अमय भास्कर बसेशंकर यांच्या घरावर हा तुकडा आदळल्याने घराच्या छताचा काही भाग कोसळला आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही वेळासाठी अफवांचीही लाट उसळली.
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनाजी जळक आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की हा तुकडा अंदाजे ५० किलो वजनाचा असून त्याची लांबी ४ फूट आणि जाडी १०-१२ मिमी आहे. हा जाड धातूचा पत्रा लोखंडाचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा तुकडा घरावर पडल्यावर तो गरम होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे हा तुकडा आकाशातून म्हणजेच एखाद्या अंतराळातील यंत्रणेचा भाग असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. पोलिसांनी हा धातूचा तुकडा ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची टीम आणि तज्ज्ञ तपासात गुंतले आहेत.