नागपूर: मुख्याध्यापकाच्या नियुक्तीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सदर पोलीस ठाण्यात यासंदर्भात नव्याने पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली असून, चौकशीत काही नव्या अधिकाऱ्यांची नावे पुढे आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
बुधवारी पोलिसांनी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अधीक्षक नीलेश मेश्राम, मुख्याध्यापक पराग पुडके, उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना न्यायालयात हजर केले. पोलिसांनी अधिक तपासासाठी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने ती नाकारत सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले.
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत मेश्राम, पुडके आणि दुधाळकर यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली असून, त्यात काही इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे संकेत मिळाले आहेत. या अधिकाऱ्यांची चौकशी लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस विभागाने या नव्या अधिकाऱ्यांची नावे अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत.