नागपूर : धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगरमध्ये सोमवारी उशिरा रात्री एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती आहे. किरकोळ वादातून १९ वर्षीय आयुष मनपिया याने ३५ वर्षीय अंकुश देवगीकर याची चाकू भोसकून हत्या केली.
माहितीनुसार, बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आयुष आणि कबाड दुकानात काम करणारा अंकुश, दोघेही त्या रात्री मद्यधुंद अवस्थेत होते. क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर वाद चिघळला.
अंकुशने आयुषला शिवीगाळ थांबवण्यास सांगितले, परंतु संतापाच्या भरात आयुषने घरातून भाजी चिरण्याचा चाकू आणला आणि अंकुशवर सपासप वार केले.गंभीर जखमी अवस्थेत अंकुशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आरोपी आयुष मनपिया याला अटक करून त्याच्यावर हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात धंतोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनामिका मिर्झापूर यांनी दिली.









