मुंबई: राज्यात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. पक्षाकडून नव्या प्रदेशाध्यक्षाच नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. चार नावांचा काँग्रेस हायकमांड कडून विचार सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अमित देशमुख यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्कारावा लागला. राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभेची निवडणूक लढवली, पण केवळ 16 जागांवर विजय मिळवण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे, राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच, नाना पटोले यांनीही आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीवारीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, आता महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे जाणार, काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता लागली असून राज्यातून या 4 नेत्यांची नावे पुढे येत आहेत.